Skip to content

रात्रीच्या गर्भातला उष:काल

December 15, 2009

रात्रीच्या गर्भातला उष:काल

अजन्मा मुलींच्या प्रश्नावर एव्हाना खूप चर्चा झाली आहे. ती करताना दरवेळी मनात यायचं की, कोणीही कितीही दबाव आणला तरी ‘मी गर्भलिंग-चिकित्सा करणार नाही, स्त्रीभ्रूणहत्या होऊ देणार नाही’, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या महिलांचे प्रमाण किती असेल? आपल्यावर अशी सक्ती करणाऱ्यांना धडा शिकवण्याची बंडखोरी कितीजणी दाखवतात? गर्भलिंगचिकित्सा कायद्याचा लाभ उठवत न्यायालयात दाद मागणाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष पीडित मातांचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. या काळोख्या वास्तवाला छेद देणारी एक लख्ख रूपेरी विद्युल्लता मध्यंतरी दिल्लीत भेटली. तिचे नाव डॉ. मितू खुराणा.
‘सुरक्षित गर्भपात’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत आम्ही या कायद्याचे अपुरेपण, परिणामकारकता आणि आव्हाने यावर विस्तृत चर्चा करत होतो, इतक्यात मितू तिथे आली. टिपिकल पंजाबी अंगकाठी असलेल्या तरुण, धीट मितूने कोणतेही आढेवेढे न घेता वा प्रस्तावना न करता थेट तिची जीवनकहाणी सांगायला सुरुवात केली..
मितू पेशाने बालरोगतज्ज्ञ. नोव्हेंबर २००४ मध्ये डॉ. कमल खुराणा यांच्याशी तिचं थाटात लग्न झालं. प्रेमाचे चार दिवस सरले आणि हुंडय़ावरून सासूने तिचा छळ सुरू केला. दरम्यान, नव्हाळीच्या दिवसांतील सहजीवनातून तिच्या गर्भात कोंब अंकुरला होता. पण त्याच्या स्वागताचा उत्सवही मितूला साजरा करता आला नाही, कारण त्या कोंबाची लिंगओळख करून घेण्यासाठी तिच्या सासूचा हेका सुरू झाला होता. मितूचा डॉक्टर नवराही मातेच्या आज्ञेबाहेर नव्हता. ‘मला लिंगओळख करून घ्यायची नाही’, असे मितू परोपरीने सांगत राहिली आणि छळाच्या नवनव्या क्लृप्त्यांना आमंत्रण देऊ लागली. दटावणी, उपासमार, कोंडमारा असे अनंत प्रकारचे छळ सहन करत मितू लिंगचाचणी न करण्याचा हट्ट चिवटपणे पुढे रेटत राहिली. पण पुढे या असह्य छळवादापायी ती आजारी पडली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्याची पाळी आली. दिल्लीच्या एका बडय़ा प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले गेले. आणि तिथे गर्भाची सुरक्षितता जाणून घेण्याच्या सबबीखाली सोनोग्राफी केली गेली. मितू अर्धशुद्धीच्या अवस्थेत असल्याचा गैरफायदा उठवत गर्भलिंग परीक्षाही केली गेली. त्यात समजले की, ती दोन मुलींना जन्म देणार आहे! ज्या घरात एक मुलगीही नकोशी होती, तिथे दोन मुली एकाच वेळी जन्मणार म्हटल्यावर सासू व नवऱ्याने आकांडतांडव केले. भ्रूणहत्या करण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला. मितू बधत नाही, असं बघून किमान एक तरी भ्रूण पाडले जावे, असाही पर्याय तिला दिला गेला. पण मितूचा विरोध ठाम होता. साहजिकच या निर्धाराची मोठी किंमत तिला मोजावी लागली. ‘घरातल्या वस्तूंना हात लावलास तर थप्पड खाशील..’ नवऱ्याने तिला बजावले आणि फोनपासून दूर एका खोलीत तिला उपाशी डांबण्यात आले. त्या अंध:कारमय वनवासातून काही क्षणांसाठी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत मितूने आपल्या वडिलांना फोन केला. आणि सासरघराला दूर सारत तिने माहेरचा आसरा घेतला.
एरवी सहाव्या महिन्यांची गर्भवती तेजस्वी आणि तजेलदार दिसते. पण काळवंडलेली, त्रासलेली ही गर्भवती मुलींना जन्म देण्यासाठी अपार संघर्ष करून माहेरी परतली होती! आई-वडिलांच्या उबदार सहवासात मितूला महिनाभर तरी गर्भारपणातली जपणूक अनुभवायला मिळाली. पण तरी नवऱ्याचा नकोसा संपर्क वारंवार तिला छळत होता. मात्र, शेवटी मितू जिंकली. ११ ऑगस्ट २००५ रोजी तिने सातव्या महिन्यातच दोन गोंडस बालिकांना जन्म दिला. मितू आणि तिच्या माहेरी या छकुल्यांचे यथोचित स्वागत झाले. सासरची मंडळी मात्र पहिले नऊ दिवस फिरकलीही नाहीत. दहाव्या दिवशी बाळांना बघायला सासरची बारात आली खरी, पण ‘अपुऱ्या दिवसांच्या अशक्त मुली कसल्या जगतायत?’, असे अभद्र ताशेरे ओढून गेली..
स्वत: बालरोगतज्ज्ञ असलेल्या त्या मातेने जुळ्या मुलींना चांगले वाढवले, सुदृढ केले. आता मितूच्या मुली चार वर्षाच्या झाल्या आहेत. शाळेत जाऊ लागल्या आहेत. मितूला तिच्या आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा आहेच, शिवाय बहीण आणि मेहुण्याचेही तिला पाठबळ आहे. मितूच्या माहेरघरी प्रेमळ वातावरणात तिच्या मुली वाढत आहेत. जिथे त्या नकोशा आहेत, त्या सासरच्यांशी आता मितूने संबंध ठेवलेला नाही. पण तिचा संघर्ष अजूनही जारी आहे.
मितूचा नवरा घटस्फोट मागतोय. पण मितूने तो नाकारलाय. का? – तर तिच्याशी काडीमोड घेऊन तिच्या नवऱ्याला नवी बायको आणायचीय. वारसदार मुलगा हवा म्हणून! त्याला ती मोकळीक का द्यायची, असा सवाल करून मितूने घटस्फोटाला नकार दिला आहे. मितूने तडजोड म्हणून त्याला घटस्फोट द्यावा, असे तिला सूचित करणाऱ्या वकिलालाही मितूने चतुर युक्तिवाद करून निरुत्तर केले.‘मुलींना जन्म देणे हे घटस्फोटाचे कारण कसे काय होऊ शकते?’ असे मितूने त्यांना बाणेदारपणे विचारले. मुलींच्या जन्माबरोबर मितूच्या मनातला सुप्त अंगार फुलला आहे. लहानपणी शांत, सोज्वळ, आज्ञाधारक असलेली मितू आता रणरागिणीच्या भूमिकेत शिरलीय. एकावर एक अशा तिच्या चार केसेस न्यायालयात चालू आहेत. गर्भलिंगचिकित्सा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल तिने नवऱ्याविरुद्ध आणि लिंगनिदान करणाऱ्या हॉस्पिटलविरुद्ध केस दाखल केली आहे. त्यातही गर्भलिंग जाणण्यासाठी केलेल्या चाचणीचा अहवाल मिळवण्यासाठी तिने माहिती अधिकाराचा वापर केला. नवरा, सासू-सासरे यांच्याविरोधात कौटुंबिक अत्याचारविरोधी कायदा व हुंडाविरोधी कायदा, तसेच तिच्या अपरोक्ष तिचे ई-मेल नवऱ्याने तपासले म्हणून हॅकिंगविरोधी कायदा- यांचा आधार घेत ती सध्या या केसेस लढवते आहे.
‘माझ्या मुलींना जन्म देऊन मी माझी व्यक्तिगत लढाई जिंकली आहे. आता माझा संघर्ष चालू आहे तो अशा विकृत मनोवृत्तीच्या विरोधात!’ ..मितूने आमच्याशी बोलताना तिची भूमिका मांडली. ‘या कायद्यांचा लाभ उठवत अधिकाधिक महिला नुसता विरोधच नव्हे, तर पुढे येऊन संघर्ष करतील तेव्हाच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार कमी होतील. बहुधा अशी याचिका करणारी मी पहिलीच महिला आहे. समाजात मी स्फूर्तीचा स्फुल्लिंग चेतवू शकले तर मला समाधान वाटेल.’
या संघर्षयात्रेत मितूला पुरुषी वर्चस्व मानणाऱ्या मनोवृत्तीचे अनेक नमुने अनुभवायला मिळाले. ‘दोनपैकी एक गर्भ पाडला तर ठीक आहे’, ‘नवऱ्याची मतं पटत नाहीत तर घटस्फोट देऊन मोकळं कर’, ‘आता तुझ्या मनासारखं झालंय ना, मग कशाला हवीय कोर्टबाजी? तुझ्या संघर्षामुळे अजन्मा मुलींचा प्रश्न थोडाच सुटणार आहे?’ अशी शेरेबाजी तिला वेळोवेळी ऐकावी लागली. केवळ आप्त-परिचितांकडूनच नाही, तर पोलीस, डॉक्टर, वकील यांच्याकडूनही! त्यात मितूला तिची हॉस्पिटलमधील नोकरीही गमावावी लागली. तेही तिचा हा लढाऊ बाणा व्यवस्थापनाला नकोसा वाटला म्हणून!
परंतु तरीही मितूने संयतपणे व ठामपणे तिचा लढा चालूच ठेवलाय. सासरच्यांची दुष्ट सावली आपल्या मुलींवर पडू नये यासाठी ती त्यांना जीवापाड जपत्येय.
स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी, त्रुटी, सूचना यांच्या चर्चाचे गुऱ्हाळ स्त्रीवादी वर्तुळात कायम चालूच असते. या चर्चेचा शेवटही ठरलेला असतो- ‘बदल कायद्यात नाही, मनोवृत्तीत व्हायला पाहिजे.’
परंतु ही मनोवृत्ती बदलणार कशी? आणि कोण? या प्रश्नांना बहुविध पर्यायांचा शोध घेणारे ब्रेनस्टॉर्मिग चालू असताना मितूसारखी तेजस्वी विद्युल्लता आमच्यात आली आणि या कार्यशाळेवर तिची आभा फाकून गेली. ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल..’ या कवितेच्या ओळी मी माझ्या दिल्लीकर हिंदीभाषिक सखीला ऐकवल्या.. तिला त्याचा अर्थ आपोआप समजला!

11.20.09

Advertisements
No comments yet

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: